सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण तसेच सातारा,कराड आणि वाईचा पश्चिम भागात भात शेती मोठ्या प्रमाणात आहे.लागवडीसाठी इंद्रायणी,बासमती या भात जातीला शेतकऱ्यांचे प्राधान्य आहे. या तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली जाते. मात्र काही वर्षापासून तालुक्यातील बाजारपेठेत तांदळाला चांगली मागणी होऊ लागल्याने व्यावसायिक पद्धतीने भात लागवड वाढली आहे. पाटण, जावळी,महाबळेश्वर, वाई, सातारा परिसरातील शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच काही शेतकऱ्यांनी इंद्रायणी तांदळाचे पॅकिंग,ब्रॅन्डीग करून ग्रामीण तसेच शहरी बाजारपेठ मिळवली आहे.

Rice Production|भात निर्मितीसाठी नवे तंत्रज्ञान
भात लागवड क्षेत्रात वाढ
सातारा जिल्ह्यात सुमारे 47 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होते.यामध्ये 80 % यांची लागवड रोप पद्धतीने आणि 20 % टोकण,पेरणीद्वारे होते.रोप लागवडीसाठी चारसूत्री तसेच एसआरआय पद्धतीचा अवलंब केला जातो.रोप लागवडी पूर्वी बैलाच्या साह्याने चिखलणी केली जात होती, आता पावर टेलर तसेच काही ठिकाणी मोठ्या ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. यांत्रिकीकरण, दर्जेदार बियाणे , योग्य लागवड पद्धतीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात उत्पादनात वाढ करत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.सोनगाव येथील संदीप चिकणे यांनी चारसूत्री पद्धतीने एक गुंठ्या मध्ये 154 किलो भात उत्पादन घेत 2021-22 मध्ये पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. वरखडवाडी येथील शेतीनिष्ठ शेतकरी नितीन वरखडे यांनी एका गुंठ्यात 138 किलो भात उत्पादन घेत पीक स्पर्धेत विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला होता.Rice Production|भात निर्मितीसाठी नवे तंत्रज्ञान
नवीन तंत्राची भात रोपवाटिका
- एक एकर क्षेत्र लक्षात घेता रोपनिर्मितीसाठी 16 किलो भात बियाणे.
- माती ऐवजी कोकोपिटचा वापर , 80 किलो कोकोपीटमध्ये दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, एक किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 500 ग्रॅम ट्रायकोडर्मा मिसळून घेतले. त्यानंतर बियाणे पेरणी.
- ट्रे पद्धतीने रोप निर्मितीसाठी १५० ते १६० ट्रे चा वापर.
- जमिनीवर रोपे करण्यासाठी चार फुट रुंद आणि १० फुट लांबीच्या प्लास्टिक कागदाचा वापर.
रोपवाटिके मध्ये सुधारणा
यंदा मे महिन्यापासून मुसळधार पावसाचे आगमन झाले. यामुळे भात व रोपवाटिकेची नियोजन कोलमडले. जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर, पाटण तसेच सातारा, कराड आणि वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात हे प्रमुख पीक आहे. मात्र सततच्या पावसामुळे रोपवाटिका तयार नसल्याने भात पिकाचा हंगाम वाया जाईल की काय, अशी भीती शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली होती. सोनगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी भानुदास चोरगे यांनी भात रोपनिर्मितीसाठी कोकोपिटाचा वापर करून रोपवाटिका तयार करण्याचा प्रयोग केला. बहुधा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असण्याची शक्यता आहे.

या प्रयोगाबाबत भानुदास चोरगे म्हणाले. की पावसाच्या वातावरणानुसार भात रोपवाटिका तयार केली जाते. जास्त पाऊस असल्यास आमच्या प्रयोगानुसार रोपवाटिका मोकळी पोल्ट्री शेड, गोठ्यात करता येते. चार फुट रुंद आणि दहा फुट लाब मल्चिंग कागद अंथरून त्यावर कोकोपीट पीठ पसरले जाते.पाऊस जास्त असल्यास या कागदाला छिद्र पाडली जाते. यामुळे कोकोपीटमध्ये पाणी साचत नाही. या कोकोपीटवर भात बियाणे पेरली जाते. यावर्षी काही शेतकऱ्यांनी हायड्रोपोनिक्स चारा ट्रेमध्ये भात रोपे तयार केली.यासाठी ट्रेमध्ये एक सेंटीमीटर उंची पर्यंत कोकोपीट पसरले . त्यावर भात बियाणे टाकून हलकासा कोकोपिटचा थर दिला. काही शेतकरी उंचवट्यावरील निचरा होणाऱ्या जमिनीवर कोकोपीट पसरून त्यावर बियाणे पसरून रोपे निर्मिती केली.या वर्षी नवीन पद्धतीने रोपे निर्मिती करून जावली तालुक्यात सोनगाव आणि बेलवडे गावात 30 एकर आणि सातारा तालुक्यात सावली गावामध्ये दहा एकरावर भात लागवड झाली आहे. या रोपाची जोमदार वाढ झाली आहे. पारंपारिक रोपवाटिकेत तण येत असल्याने भागलन करावी लागत होती. मात्र कोकोपीट वापरामुळे तण येत नसल्याने भागलन खर्च कमी झाला आहे.Rice Production
नव्या तंत्राच्या रोपवाटिकेचे फायदे
- 15 ते 17 दिवसात रोपे लागवडीसाठी तयार होतात.
- नेहमीच्या रोपवाटिकेपेक्षा कमी खर्चात रोप निर्मिती.
- रोपवाटिकेसाठी जुन्या पद्धतीने रान भाजण्याची गरज नाही. नवीन तंत्राची रोपवाटिका पर्यावरणपूरक.
- माती ऐवजी कोकोपीट वापरल्याने निरोगी रोप निर्मिती.
- तयार झालेली रोपे काढण्यासाठी अत्यंत कमी मजुरांची आवश्यकता.
- मुळे खोल जात नसल्याने रोप काढणी सोपी.
- अवकाळी, अतिवृष्टी किवा पाऊस नसतानाही रोप निर्मिती शक्य.
- रोपांमुळे वेळेवर लागवड शक्य.भात रोपवाटिका हा नवीन व्यवसाय.