
महाराष्ट्र मध्ये कापूस हे नगदी आणि महत्वाचे पीक आहे. मात्र गेल्या वर्षापासून या पिकामध्ये अनेक आव्हाने निर्माण झाल्याचे चित्र आहे. कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना सामान्यतः बियाणांसह सर्वच निविष्ठांच्या खर्चात झालेली वाढ, कीड- रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि रासायनिक खतांच्या वाढत्या किमती यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अंतिमत उत्पादन खर्च प्रचंड वाढ झाली असेन,त्या तुलनेमध्ये उत्पादनामध्ये अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही .त्यामुळे उत्पादकता वाढीवर काम करत असताना पर्याय कमी किमतीच्या निविष्ठांचा वापरावर भर देत उत्पादन खर्च किमान पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
उत्पादन खर्च कमी करणाऱ्या पर्यायाकडे वळणे गरजेचे
कोणत्याही पिकाची उत्पादकता जितकी महत्त्वाची असते. तितकाच त्यासाठी झालेला उत्पादन खर्च मर्यादित ठेवणे गरजेचे असते. कारण त्यावरच निव्वळ नफ्याचे प्रमाण ठरत असते. त्यामुळे पिकाची उत्पादकता वाढवण्याचा विचार करत असतानाच उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पिकाच्या व्यवस्थापनेमध्ये योग्य ते बदल करत कमी खर्चाच्या पर्यायी निविष्ठांच्या वापरावर भर द्यावा लागतो. त्यातच खरी व्यवहारिकता असते. नैसर्गिक साधन संपत्तीचाही अत्यंत कार्यक्षम वापर करण्यावर भर देण्याची गरज आहे.
कमी खर्चाची पर्यायी उपाय
अन्नद्रव्य व्यवस्थापन
कपाशी पिकासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचे असते. त्याचा थेट परिणाम पिकाची वाढ, उत्पादन आणि गुणवत्तेवर होत असतो. रासायानिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. शेतकरी मुख्य अन्नद्रव्ये उदा.नत्र,स्फुरद,पालाश याच्या पुर्ततेकडे लक्ष देतात. मात्र त्यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांची कार्यक्षमता ही सेंद्रिय खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापरातून वाढत असते. लोह(Fe), जस्त (Za), मॅग्नेशियम (Mg) आणि कॅल्शियम (Ca) हे कापसाच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. याचेही विविध महागडी रासायनिक फोर्मुलेशन्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र स्वस्त सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी पर्यायी मार्ग शोधले पाहिजे. उदा.झिंकसाठी कडूनिब पिंडीचा वापर करता येईल, तर मॅग्नेशिअमसाठी जिप्सम वापरता येते.
सेंद्रिय खत
जमिनीत सेंद्रिय खतांचा नियमित आणि योग्य प्रमाण वापर करणे गरजेचे असते. उत्तम कुजलेले कंपोस्ट खत जमिनीची सुपिकता वाढवते. सेंद्रिय पदार्थ व त्यातील अन्नद्रव्ये ही पिकांना सावकाश उपलब्ध होतात. वापरलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवतात. सेंद्रिय पदार्थमुळे ,मातीची रचना,जलधारणक्षमता आणि सुपीकता वाढते.
पीक अवशेष
मागील पिकाची काढणी केल्यानंतर शिल्लक राहिलेले अवशेष किवा सेंद्रिय पदार्थ शेतातच राहू द्यावेत. ते जागेवर कुजण्यासाठी आणि त्यातून मागील पिकावरील कीड-रोगांचा कुठे प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. त्यामुळे जागेवरच मोफत किंवा फारच अल्प खर्चामध्ये सेंद्रिय खतांची उपलब्धता होते. रासायनिक खतांवरील खर्चात बचत करता येते.उत्पादन खर्च कमी करणाऱ्या पर्यायाकडे वळणे गरजेचे
पीक फेरपालट
शेतामध्ये पिकाची फेरपालट करताना त्यात शेगावर्गीय पिकांचा समावेश करावा. (उदा. सोयाबीन किंवा मसूर या पिकांमध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू वाढतात. ते वातावरणातील नत्र मातीमध्ये पिकांना उपलब्ध करण्याचे काम करतात.हिरवळीच्या खत पिकामध्ये क्लोव्हर किवा अल्फाअल्फा या सारख्या आच्छादन पिकाची लागवड फायदेशीर ठरते .योग्य काळानंतर ही पिके जमिनीत गाडली जातात.त्यातून पुढील पिकाला पोषक अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होतात. उत्पादन खर्च कमी करणाऱ्या पर्यायाकडे वळणे गरजेचे
नैसर्गिक कीड-रोग नियंत्रण
सध्या प्रत्येक कीड रोगांसाठी तातडीने रासायनिक कीडनाशकांची फवारणी करण्याकडे शेतकऱ्याचा कल आहे.ही बाब शेतकऱ्याच्या आरोग्यासोबतच पर्यावरणास हानिकारक ठरू शकते.त्यांच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही वाढत आहे. नैसर्गिक आणि शाश्वत अशा एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीकडे वळण्याची गरज आहे. पिकांवरील किडीच्या नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या शत्रूचे संवर्धन आणि प्रसारण करता येते. आपल्या शेतातील मित्र कीटकांची ओळख पटवून त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत. शेतामध्ये पक्षी थांब्याच्या सोई कराव्यात. यातून किडीचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कमी ठेवणे शक्य होते. तसेच कापूस पिकांमध्ये विविध बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यांच्या नियंत्रणासाठी आपल्या परिसरात उपलब्ध होणाऱ्या विविध वनस्पती वापरता येते. उदा. कडुलिंबाचे तेल, लसूण आधारित द्रावण इ. वनस्पतीचे प्रादुर्भावग्रस्त भाग त्वरित काढून त्याची वेळीच विल्हेवाट लावल्यास संभाव्य प्रादुर्भाव कमी करता येतो.
फायद्यात लक्षणीय वाढ शक्य
- पारंपारिक पीक पद्धतीपेक्षा कापूस उत्पादनात नैसर्गिक व कमी खर्चिक रुपयांचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्चात मोठा दिलासा मिळू शकतो.
- रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खत, कपोस्ट व शेणखत यांचा वापर केल्यास खतावरील खर्चात 30 ते 35 टक्क्याची बचत होते.
- कीड व रोग नियंत्रणासाठी लसूण, हळद व निंबोळी अर्क यासारख्या नैसर्गिक कीडनाशकांचा वापर केल्यास महागड्या रासायनिक कीडनाशकांचा वापर कमी करावा लागतो. त्यावरील खर्चात साधारणतः 25 ते 30 टक्के पर्यंत बचत होते.
- ठिबक सिंचन व आच्छादन या दोन्ही घटकांचा वापर केल्यास पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापनासोबत पाणी पाळी देण्याचा मजूर खर्च वाढतो.
- पीक पद्धतीमध्ये फेरपालट करताना शेंग वर्गीय पिकाचा समावेश केल्यास पुढील पिकाच्या नत्र युक्त खताचा वापर शिफारशीपेक्षा कमी करता येतो. जमिनीची सुपीकता वाढल्याने दिलेल्या खताचा कार्यक्षम वापर होतो.
- एकंदरीत वरील सर्व उपाययोजना शेतकऱ्यांने केल्यास त्याच्या एकूण उत्पादन खर्चात पारंपारिक पद्धतीच्या तुलनेमध्ये 35 ते 45 टक्के इतकी घट दिसून आली आहे.निविष्ठांची कार्यक्षमता वाढल्यामुळे उत्पादनामध्येही वाढ शक्य होते. ही उत्पादनातील वाढ आणि खर्चातील घट यामुळे शेतकऱ्यांचे नफ्याचे प्रमाण 10 ते 40% टक्क्या पर्यंत वाढू शकते.( यात आपण बाजारभावातील चढ-उतार स्थिर मानले आहेत .)